जय भिम मंडळी..( हा लेख एका whats app ग्रुप साठी लिहीला होता)
एवढ्या सकाळच्या पारी ह्यो लांबडा लेख पाहून अचंबित व्हाल.तस काय आश्चर्य वाटून घेऊ नका.जे जे आपणास ठावे...या उक्तीप्रमाणे आमचं चाललेलं असतं,एवढंच.गेल्या काही दिवसांपासून 'कृष्णाकाठ'वाचतोय.कृष्णाकाठ हे दिंवगत नेते यंशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र. मोबाईल आल्यापासून पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमी झालय खरं.पण काही पुस्तक वाचायला आवडतील इतकी चांगली आहेत.मी हे पुस्तक वाचतोय आणी या पुस्तकातील साधी,सरळ भाषा लळा लावतेय.
या पुस्तकाची पार्श्वभूमी पारतंत्र्याची,स्वातत्र्यासाठी सुरू झालेल्या राजकीय चळवळीची.चव्हाण साहेब आपल्याला त्या काळातील सातारा परिसरातील चळवळीचा इतिहास सांगतात.शिक्षण घेत घेत राजकारणाशी त्यांचा संबध कसा आला ते सांगतात.१९३७ मध्ये विधीमंडळांच्या निवडणूका कशा जाहीर झाल्या व त्या निवडणूकी मध्ये आपल्या नेत्याला कसं लढवून आणलं याच वर्णन मला आवडलं.सातारा परिसरात चव्हाण साहेब आणी त्यांचे सहकारी कॉग्रेस अतर्गंत चळवळीमध्ये भाग घेत असत.सविनय कायदेभंग,जेलभरो आदोंलन,जेलच्या आतमध्ये शिक्षण,थोरामोठ्यांचा सहवास यातुन एक कार्यकर्त्याचा पिंड आकारास येत होता.उद्याच नैतृत्व त्यातुनच फुलणार होतं.पुढे कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सुध्दा सातारा येथील चळवळीकडे सुध्दा साहेब लक्ष ठेवून होते.
दरम्यान विधीमंडळाच्या निवडणूका लागतात.विधीमंडळात आपल्या तरूण शेतकरी सुसंस्कृत मित्राला,आत्माराम पाटील यांना संधी मिळावी आणी त्यांना तिकिट मिळावी या साठी सातार्यातील बुजूर्ग मंडळीना भेटणे.त्याचबरोबर आत्माराम पाटील यांच्या नैतृत्वाला संधी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे अस साहेबांचे काम चालू होतं.दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांना जाऊन भेटणे आणी तिकीटाविषयी आग्रह करण्याची जबाबदारी यंशवंतरावावर येऊन पडते तेंव्हा ते सरदारांना जाऊन भेटतात.ही त्यांची भेट मुंबई मध्ये होते.दोन तीन मिनीट सरदार यंशव़ंतरावाना ऐकून घेतात आणी मोजके प्रश्न विचारतात.या भेटीचा परिणाम काय होईल या अनिश्चिततेमध्ये साहेब सातार्याला परततात.पण सुदैवानं आत्माराम पाटील यांना तिकीट मिळतं.मग सुरू होतो प्रचार.कार्यकर्ते असलेले चव्हाण साहेब मग कराड आणी पाटण परिसर अक्षरशः पिंजून काढतात. हा सर्व परिसर ते कधी सायकल तर कधी चालत फिरतात.लोकांना जाऊन भेटतात आणी आपल्या मित्राला म्हणजे आत्माराम पाटील यांना निवडून आणतात.ही गोष्ट आपण येथेच थाबंवू.
या गोष्टीवरून आपणास काय समजते? नेत्याला प्रस्थापित करण्यामध्ये कार्यकर्त्याची भुमिका महत्वाची असते हेच ना? किंवा प्रस्थापित नेत्याला जनमानसात वाढविण्याची सुध्दा जबाबदारी कार्यकर्त्यांने पार पाडायला हवी.कार्यसम्राट नेते असतील तर त्यांची प्रतिमा आणी त्यांच्या कार्याचा प्रचार आणी प्रसार करण्याची महत्वाची जबाबदारी कार्यकर्त्यांचीच असते. एवढंच नव्हे जनतेच्या इच्छा आकांक्षा त्याच्या समस्या,अडचणी यांना वाचा फोडण्याचं काम सुध्दा कार्यकर्त्यांच.म्हणजे एका अर्थाने कार्यकर्ता हा जनता आणी नेता या दोघांमधला दुवा असतो. आपले कार्य अस महत्वपूर्ण असल्याने कार्यकर्त्याने जागरूक राहून काम केलं पाहीजे अन्यथा नेत्याचा कपाळमोक्ष आणी जनतेचा भ्रमनिरास होतो.लाभार्थी कार्यकर्ता नेत्याचा खुषमस्कर्या बनला तर धोका ठरलेलाच असतो.अलिकडच्या काळात हे चित्र आपल्याला सगळीकडं दिसत.कार्यकर्ता नेत्याशी सलगी साधतो नेत्याची हूजरेगिरी करतो.नेत्याबरोबरचे फोटो घरात,गाडीत आपल्या ऑफिस मध्ये लावतो, नेत्याचा ताईत बनतो.त्याचवेळी तो जनतेकडे दुर्लक्ष करतो.त्यांच्या समस्या आणी अडचणी त्याच्या दृष्टीने गौण बनतात.आणी आपल्याच भातावर तुप कसं पडेल याच्या विचारात कार्यकर्ता राहतो.आणी याचा परिणाम व्हायचा तोच होतो.कार्यसम्राट नेता कामाचा डोंगर उभा करून पण सफशेल पडतो,अपयशी ठरतो.त्याचं हे अपयश खरतर कार्यकर्त्यांचं अपयश असतं....
हेमंत तेलवेकर